Friday, October 19, 2007

कोल्हापूरची अंबाबाई (महालक्ष्मी)

दक्षिण महाराष्ट्रातील `कोल्हापूर' हे शहर ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे आहे. त्याला `दक्षिण काशी` म्हणतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीनेही ते उल्लेखनीय आहे. हे शहर प्रथम देवगिरीच्या यादव राजांच्या ताब्यात होते. नंतर ते शिवाजीराजांनी विजापूकरकरांकडून जिंकून घेतले. पुढे मराठा छथपतींच्या दोन गाद्या झाल्या. एक साताऱ्याची व दुसरी कोल्हापूरची. गेल्या शतकात छत्रपती शाहूमहाराजांनी आपल्या संस्थानामध्ये समाजसुधारणेचे बरेच प्रयत्न केले. कोल्हापुरचे महालक्ष्मीचे भव्य पुरातन हेमाडपंती मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. महाव्दार रोडवरील या मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात. इ.स. ६३४ मध्ये चालुक्य राजा कर्णदेव ह्याने हे मंदिर बांधले. त्यानंतर कोल्हापूरला यादवांचे राज्य होते. १३ व्या शतकापासून ते मोगलांच्या ताब्यात गेले. १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी कोल्हापूर जिंकले. काही काळ तेथे मराठ्यांची राजधानी होती. स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते स्वतंत्र संस्थान होते. छत्रपतींचे गाव असल्याने तेथे जुना व नवा राजवाडा, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानीचे मंदिर, शालिनी पॅलेस, रंकाळा तलाव, गावाबाहेरील टेकडीवरील टेंबलाई मंदिर, गावातील बिनखांबी गणपती मंदिर अशा बऱ्याच गोष्टी प्रेक्षणीय आहेत. अंबाबाई मंदिराच्या परिसरात प्रसादाची दुकाने, बांगड्यांची दुकाने, खणा-नारळाची दुकाने आहेत. महाव्दार रोडवर साड्यांची दुकाने असून, सराफाही जवळच आहे. देवीची साडी खणा-नारळाने ओटी भरतात. मंगळवारी गाभाऱ्यात फक्त महिलांना प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील देवीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे विशेष स्थान आहे.

1 comment:

Unknown said...

JAI BHAVANI,JAI SHIVAJI.