प्राचीन काल -
हा काल श्री महालक्ष्मीच्या स्थापनेपूर्वीचा म्हणजे इसवीसनाच्या सुमारे ९व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या काळात नदीकाठावरील टेकडीवर ब्रह्मपुरी हे वसाहतीचे केंद्र होते.
मध्ययुग
श्री महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेपासून रेसिडन्सीची स्थापना होईपर्यंतच्या म्हणजे इंग्रजी राजवटीच्या सुरूवातीच्या कालापर्यंतच्या दुसऱ्या कालखंडाला शहराच्या इतिहासातील मध्ययुग असे म्हटले जाते. या कालात श्री महालक्ष्मी देवालय हेच धार्मिक व राजकीय असे मुख्य केंद्र होते.
अर्वाचीन काल -
कोल्हापूर इ.स.१८४४-४८ साली रेसिडेंसी स्थापन झाल्यापासून शहराच्या आधुनिक युगाला सुरूवात होते. हा काल स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचाच धरून स्वातंत्र्योत्तर काल त्यापासून वेगळा धरण्यास हरकत नाही.
मानव हा आपल्या वसाहती पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी म्हणजेच नदी वा तलावांकाठी वसवीत आला आहे. कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता यावी या तिन्ही उद्देशाने केलेेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते. आर्यांच्या आगमनानंतर हे नाव मिळाले असावे. या विभागात प्राचीनकाळी मुख्यत: ब्राह्मण वस्ती जास्त असल्यामुळे याला ब्रह्मपुरी असे नाव पडले असावे. या नावाविषयी अशी एक दंतकथा आहे की हे गाव कसे वसविले गेले याची माहिती नसल्यामुळे स्वत: ब्रह्मदेवाने ते निर्माण केले अशी आख्यायिका प्रसृत होऊन त्याला ब्रह्मपुरी हे नाव रूढ झालेे.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी ही एक राजधानी अगर मोठे शहर होते. इ.स.१०६ ते १३० च्या दरम्यान हे शहर नदीच्या काठावर विटांच्या सुंदर घरांनी परिपूर्ण होते. त्या काळात दक्षिणेला सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी वा शातवाहनांचे राज्य होते. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या शहराचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तू, नाणी, व ब्रंाझ धातूची भांडी इत्यादीचे अनुकरण मातीमध्ये केलेल्याचे आढळते. हे शहर बहुधा श्री यज्ञ शातकर्णी याच्या कारकीर्दीत आगीने उध्वस्त झाले असावे. बह्मपुरीच्या ऐश्वर्याला इसवीसनाच्या दुसऱ्या शतकानंतर ओहोटी लागली आणि दुदैवाने ब्रम्हपुरीचे गेलेले ऐश्वर्य पुन्हा परत आलेच नाही. कारण ब्रम्हपुरीच्या नाशानंतर काही कालांतराने श्री महालक्ष्मीचे देवालय स्थापन झाले आणि कोल्हापूर शहराची वाढ श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र बनून त्याच्या सभोवताली झाली.
कालानुक्रमे विचार करता ब्रम्हपुरीनंतर उत्तरेश्वराच्या विचार केला जातो. ब्रम्हपुरी ही अधिक सोयीची जागा वसाहतीने व्यापल्यानंतर कमी सोयीच्या ठिकाणी म्हणजे नदीपासून थोड्या अंतरावर ब्रम्हपुरीपेक्षा कमी उंचीच्या टेकडीवर वसाहत झाली. हीच उत्तरेश्वराची वसाहत. ब्रम्हपुरी प्रमाणेच इथेही उत्खननात जुने अवशेष सापडतात. परंतु सध्या तिथे लोकवस्ती खूपच दाट झाल्यामुळे उत्खनन अशक्य झाले. उत्तरेश्वर या नावासंबंधी काही माहिती उपलब्ध नाही. ज्या देवालयाला हल्ली उत्तरेश्वर म्हणून दाखविले जाते ते शंकराचे देवालय आहे. त्यामधील शंकराची पिंड सुमारे चार माणसांच्या कवेत मावेल इतकी मोठी आहे. हे देवालय केव्हा बांधले गेले य संबंधी देखील काही माहिती उपलब्ध नाही. उत्तरेश्वराच्या दक्षिणेला श्री महालक्ष्मीचे देवालय वगैरे भागात लोकवस्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तरेकडील देव यावरून उत्तरेश्वर हे नाव रूढ केले असावे.
ब्रम्हपुरी व उत्तरेश्वर या प्रमाणेच खोल खंडोबा ही देखील एक टेकडीच आहे. ब्रम्हपुरीपेक्षाही तिची उंची थोडी अधिक आहे. येथील वसाहत वरील दोन्ही वसाहतीनंतर झाली असावी कारण येथे सोयी कमी असून हे ठिकाण नदीपासून दूर आहे. खोल खंडोबा हे एक जुने देऊळ आहे. त्याचा आकार बाहेरून मशिदीसारखा दिसतो, कारण त्यावर मुसलमानी पद्धतीचर घुमट आहे. शिवाय हा देव बसविलेली जागा जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. म्हणूनच याला खोल खंडोबा असे म्हणतात. या देवालयाचा आकार मशिदीसारखा का असावा या संबंधी विचार करता दोन अंदाज बांधता येतील. एक म्हणजे मुसलमानंाच्या स्वाऱ्या झाल्यास त्यांच्या हिंदू देवांच्या मूर्तिभंजक प्रवृत्तीपासून संरक्षण म्हणून देवालयाचा बाहेरचा आकार मशिदीसारखा केल्याल्यास ते तिकडे फिरकणार नाहीत. परंतु असे आढळून येते की या भागात इतरही अनेक देवालये असून त्यांचा बाह्य आकार मशिदीसारखा नाही फक्त एकच देवालय तसे बांधण्याचे काहीच प्रयोजन नाही. म्हणून हा अंदाज तितकासा योग्य वाटत नाही. दुसरा अंदाज असा की या देवालयाचे बांधकाम कुणीतरी मुसलमान कारागीराने केले असावे, आणि हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यामुळे याला कुणीही विरोध दर्शविला नसावा आणि हा अंदाज पटण्यास काही हरकत नाही. कारण याच्या पुष्ट्यर्थ आणखी दोन उदाहरणे पहावयास मिळतात. ती म्हणजे बाबूजमाल या मशिदीच्या चौकटीवर श्री गणेशाचे चित्र व पन्हाळगडावरील एका द्वाराच्या चौकटीवर कोरलेल्या गणेशाच्या डोक्यावरील मुसलमानी पद्धतीची टोपी. यावरून कोल्हापूरात हिंदू मुसलमान ऐक्य फार पूर्वीपासून आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
खोल खंडोबा हे नाव देण्याचे कारण प्राचीन वस्ती नाश झाल्यामुळे आजूबाजूची घरे पडून उंचवटे निर्माण झाले आणि एकेकाळी जमिनीवर असलेला देव जमिनीच्या पातळीखाली गेला व लोकांनी त्याला न हलविता तसेच देऊळ बांधले आणि आजूबाजूची जमीन न उकरता उंचवटयावर पुन्हा वस्ती केली. या ठिकाणी देखील जुने अवशेष सापडतात पण उत्तरेश्वराप्रमाणेच इथेही सध्या दाट लोकवस्ती झाल्याने उत्खनन करणे अशक्य झाले आहे. जुन्या कागदपत्रात या भागाला केसापूर असे संबोधिलेले आढळते. परंतू हे नाव रूढ झालेले दिसत नाही.
ब्रम्हपुरीची वाढ होऊन ती नाश झाली तरी उत्तरेश्वर व खोल खंडोबा यांची वाढ मंदगतीने सुरू होती. त्यांची फार मोठी वाढ झाली नाही व नाशही झाला नाही. वरील तीनही नैसर्गिक केंद्रे स्थापन झाली व त्यांनतर रंकाळा, पद्माळा व रावणेश्वर ही तळयाजवळील केंद्रे निर्माण झाली. रंकाळा केंद्र हे यापैकी सर्वांत जुने असावे. या ठिकाणी संध्यामठ ही सुंदर इमारत व नंदीचे देवालय प्राचीन काळी बांधले गेले. हा नंदी प्रतीवर्षी एक गहू पुढे सरकतो व तो सरकत सरकत रंकाळयात पडल्यावर प्रलय होणार अशी एक दंतकथा आहे. या देवालयातील नंदी सुमारे ५.५ फूट उंचीचा आहे. वरील दंतकथेची वस्तुस्थिती अशी की, आठव्या किंवा नवव्या शतकात जो मोठा भूकंप झाला व ज्यामुळे रंकाळा तलाव निर्माण झाला त्याचवेळी या देवालयातील नंदी(ज्याला पाय नाहीत असा) धरणीकंपामुळे पुढे सरकला असावा. ही गोष्ट लवकर लक्षात न आल्यामुळे कालांतराने वर लिहिलेली दंतकथा प्रसृत झाली असावी. या मंदिराचा अलिकडेच म्हणजे सन १९६९ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मुख्य नंदीचे देवालय पुन्हा बांधले असून देवळासमोर असलेल्या पुरातन शिवपिंडीवर मंडप बांधण्यात आला आहे.
पूर्वी प्रत्येक गावात एक महारवाडा असे. या महारवाड्यावर गावाचे स्वतंत्र आस्तित्व दिसून येत असे रंकाळा केंद्र हे ब्रम्हपुरीशी संबंध नसलेले एक स्वतंंत्र गाव होते. हे इथे असलेल्या महारवाड्यावरून सिद्ध होते. हा महारवाडा अद्यापी फिरंगाईजवळ आहे. कोल्हापूर शहर वाढल्यावर या भागाला नवा बुधवार हे नाव देण्यात आले होते. म्हणून हा नवा बुधवार व खोल खंडोबा हा जुना बुधवार म्हणून काही काळ ओळखला जात होता. सध्या रंकाळा म्हणजेच नवा बुधवार भागाला शिवाजी पेठ नावाने ओळखले जाते.
पद्माळा केंद्र
हे एक समकालीन खेडे होते. जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख नवे जिजापूर असा आढळतो. या खेडयाला स्वतंत्र महारवाडा नव्हता. फिरंगाईच्याच महारवाड्याचा या वस्तीला उपयोग होत असावा. येथे जुने अवशेष सापडत नाहीत.
रावणेश्वर कंेद्र
ही देखील एक स्वतंत्र व जुनी वसाहत आहे. या खेड्याचा स्वतंत्र असा महारवाडा हलविला गेला आणि जवळील महार तळे बुजविले जाऊन सध्या तेथे राजाराम कॉलेज (सायन्स विभाग), राजाराम (अयोध्या) टॉकिज, आईसाहेब महाराज यांचा पुतळा, शाहू टॉकीज, सध्याची स्टेट बँक इमारत अशा इमारती उठल्या आहेत. या भागाला रविवार पेठ असे नाव आहे. तत्पूर्वी त्याचे नाव हिरापूर असे होते. पद्माळयाप्रमाणे येथेही जुने अवशेष सापडत नाहीत. पद्माळा व रावणेश्वर हे दोन तलाव होते. ते बुजवून अनुक्रमे सध्या गंाधी मैदान (किंवा वरूणतीर्थ वेस मैदान) व श्री शाहू स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले.
ज्याप्रमाणे नदीकाठाच्या तीन केंद्रांचा एक विभाग मानणे शक्य आहे त्याचप्रमाणे तळयाकाठच्या या तीनही केंद्रांचा स्वतंत्र विभाग मानला जातो. इसवीसनाच्या ९व्या शतकाच्या सुमारास ही सहाही केंद्रे लहान खेड्यांच्या स्वरूपात स्वतंत्रपणे अस्तित्वात होती.
मध्ययुगीन कोल्हापूर
ब्रम्हपुरी शहराचा दुसऱ्या शतकात नाश झाल्यावर या भागाचे महत्व कमी झाले इ.स. ५०० पर्यंतच्या शिलालेखात कोल्हापूरचा स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. इसवी सन २०० ते ८०० पर्यंतच्या काळात कोल्हापूरला राजकीय किंवा धार्मिक महत्त्व नव्हते. म्हणून या सहा शतकांना कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते. श्री महालक्ष्मीच्या देवालयाने या रात्रीचा शेवट केला इसवी सन ९ व्या शतकाच्या दरम्यान या देवालयाची पूर्तता झाली चालुक्य राजवंशातील राजा कर्णदेव यांनी इसवी सन ६३४ मध्ये श्री महालक्ष्मीचे देवालय बांधले. परंतु या देवालयाचे बांधकाम बरेच दिवस चालू होते. हे देवालय एकाचवेळी व एकाच राजाने न बांधता वेळोवेळी अनेकांनी त्यांची वाढ केली किवा त्यात सुधारणा केली. देवालयाच्या पूर्णतेनंतरच कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र संपून उत्कर्षास सुरूवात झाली.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे की हे देवालय एका रात्रीत बांधले गेले. खोल विचार करता हे अर्धसत्य असल्याचे आपणास पटते. या दंतकथेतील सत्य इतकेच की ती रात्र नेहमीची १२ तासाची नसून सुमारे २०० वर्षापेक्षा जास्त काळाची आहे. ही रात्र म्हणजेच करवीरच्या इतिहासाची रात्र होय. इ.स.२०० ते ८०० वर्षाचा काल हा कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते हे वर उधृत केले आहे. आणि याच ऐतिहासिक रात्रीच्या शेेवटच्या दोन शतकात हे महालक्ष्मीचे देऊळ बांधले गेले आहे. तेव्हा आपण हेे लक्षात घेतले पाहिजे की एखादी दंतकथा जेव्हा तयार होते ती कोणत्या ना कोणत्या तरी अल्पशा का होईना सत्यावर आधारीत असते. एक लहान बिंदू मध्याभोवती हवे तेवढे मोठे वर्तुळ निर्माण करता येते, तसेच अल्पशा सत्यांशावर अतिशयोक्तीपूर्ण दंतकथा निर्माण हेात असते.
श्री महालक्ष्मी देवालयाशी संबधित एक वैशिष्ट्य वा वैचित्र्य दिसून येते. सर्वसाधारणपणे उंचवट्याच्या जागा किंवा टेकड्यावर देवालये बांधली जातात. परंतु या देवालयाच्या बाबतीत पाहिले असता, हे देवालय अगदी सखल भागात बांधले आहे. या देवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही दिशेने आले तरी खाली उतरावे आगते. सध्या देवळाभोवती दाट वस्ती असल्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीची स्पष्ट कल्पना येत नाही. ही जागा सखल, दलदलीची व जवळूनच ओढा वाहणारी होती. अशा जागेत देऊळ का बांधले गेले हे जरी सांगता येत नसले तरी एवढे मात्र सत्य की अशा घाणेरड्या व दलदलीच्या जागेवर देऊळ बांधल्यामुळे तिचे नंदनवन झाले. मेजर ग्रॅहमने कोल्हापूरला करवीर असे का म्हणतात याचे कारण सांगितले आहे. महालक्ष्मीने आपल्या कराने हा प्रदेश प्रलय काळाच्या पाण्यामधून वर उचलला (वीर) म्हणून त्याला करवीर असे म्हणतात. करवीर महात्मामध्येही अशाच अर्थाचा उल्लेख आहे. याचा भौगोलिक अर्थ एवढाच की, हा भाग प्रथम सखल व दलदलीचा होता, आणि या देवालयामुळे तो वर उचलला जाऊन स्वच्छ व सुंदर झाला. (याच सारखे अगदी अलिकडे म्हणजे दहा वर्षातील छोटेसे उदाहरण म्हणजे जयंतीच्या नाल्याजवळील गणेश मंदिरासमोरील जागाही अशीच घाणेरडी होती. परंतु तेथे महादेवाचे देवालय उभारल्यावर तीच जागा स्वच्छ, पवित्र व प्रसन्न वाटू लागली.)
श्री महालक्ष्मी देवालय स्थापन झाल्यांनतर प्रथमच करवीर हा शब्द वापरलेला आढळतो. तत्पूर्वी या शहराचा उल्लेख करताना कोल्हापूर, कोल्लपूर, कोलगिरी, कोल्लादिगिरी पट्टण इत्यादी नावे वापरलेली दिसून येतात. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी व त्यानंतर अनेक शतकांपर्यंत या शहराचे जुने व सार्वसंमत असे नाव म्हणजे कोल्लापूर म्हणजे दरीतील गाव. कोल्लादिगिरीपट्टण याचा अर्थ थोडासा विस्तारित पण तसाच आहे. कोल्ला म्हणले सखल भाग, गिरी म्हणजे डोंगर वा पर्वत, ददिगिरी(द-दि+गिरी) म्हणजे पर्वताने व डोंगराने वेढलेले शहर वा गांव. भौगोलिक दृष्टीने हे नाव सार्थ आहे. पंडित वा पुजारी वर्गाने कोल्लापूर याचा अर्थ अडाणी लोकांना पटवून सांगण्याकरिता अक्कल हुषारी वापरून, घाणेरड्या जागेचा महालक्ष्मी देवालयामुळे नाश झाला असे सांगण्याऐवजी कोला नावाच्या राक्षसाचा (घाणेरड्या जागेचे रूपक) महालक्ष्मीने वध केला, अशी दंतकथा निर्माण केली. अडाण्यांना पटवून सांगण्याचा हा एक प्रामाणिक उपाय किंवा प्रयत्न आहे. कालांतराने शब्दाचा मूळ अर्थ विसरला गेल्यामुळे शहाण्या सुशिक्षित लोकांना ती दंतकथा वाटू लागली इतकेच आणि आजही कोणी शब्दाचा मूळ अर्थ व कथेचा उद्देश लक्षात घेत नसल्यामुळे तिला दंतकथाच मानले. एकोणिसाव्या शतकापर्यंम्त कोल्लापूर अगर कोलापूर असेच शब्द वापरले जात होते. कोला या शब्दावरून व्युत्पती रूढ झाल्यावर त्या शब्दाचा उच्चार कोल्हा असा झाला असावा. किंवा कोल्लापूर या शब्दाचे कानडी वळण टाकून त्याला शुद्ध मराठी स्वरूप देताना या ह कराचा प्रवेश झाला असण्याची शक्यता अधिक आहे.
धार्मिक कंेद्र
श्री महालक्ष्मी देवालयानंतर कोल्हापूरचे साध्या गावामधून प्रथम तीर्थामध्ये व नंतर महातीर्थामध्ये रूपांतर झाले आणि पंडित पुजाऱ्यांनी तर धार्मिक दृष्ट्या फारच महत्त्व मिळवून दिले.
राजकीय केंद्र
अल्पावधीतच कोल्हापूर हे केवळ धार्मिक क्षत्रे न राहता, राजकीय केंद्रही बनले. राष्ट्न्कूटानंतर इ.स. १२ व्या शतकात कोल्हापूर व परिसरात वंशाच्या राजांचे राज्य होते. त्यानंतर या भागात देवगिरीच्या यादवांचे राज्य स्थापन झाले व त्यंाच्या एका प्रांताची राजधानी कोल्हापूर ही होती. याचा अर्थ कोल्हापूरला ११ व्या शतकानंतर पुन्हा राजधानीचे स्वरूप आले. परंतु यावेळी ही राजधानी ब्रम्हपुरीवर न होता महालक्ष्मीच्या देवालयाजवळ ठेवली गेली. इ.सन. १३०६ ते १३०७ मध्ये देवगिरीच्या यादवांचा मुसलमानांनी पाडाव केला. तेव्हापासून ते इ.स. १६५९ साली थोरल्या शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकेपर्यंत या भागात मुसलमानांचा अंमल होता. त्यांनी श्री महालक्ष्मी देवालय हेच केंद्र समजून आपली वसाहत केली. त्यांचा राजवाडा हल्लीच्या जुन्या राजवाड्याच्या जवळच कुठेतरी असावा. त्यांनी तीन मोठ्या मशिदी देवालयाच्या जवळच व सभोवती बांधल्या. आश्यर्य म्हणजे एकाही मुसलमान राजाने महालक्ष्मी देवालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला नाही. (खुद्द औरंगजेबही कोल्हापूरला येऊन गेला होता) याचे कारण म्हणजे इथल्या हिंदूंना त्यांनी सहिष्णूतेची वागणूक दिली असावी. १७ व्या शतकात छ. शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना केली व कोल्हापूरास छत्रपतींचे राज्य सुरू झाले. त्यानंतर ताराबाईने करवीर राज्यांची स्थापना केल्यामुळे कोल्हापूराचे महत्व त्याला प्राप्त झाले. इ.स. १० व्या व ११ व्या शतकापासून चालत आलेल्या या परंपरेला अनुसरून छत्रपतींनीसुद्धा श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र मानून कुलस्वामिनी भवानीचे देवालय व राजवाडा श्री महालक्ष्मीचे देवालयाशेजारीच बांधला.
श्री महालक्ष्मी देवालयाचा परिसर
महालक्ष्मीचे देवालय हे धार्मिक केंद्र बनल्यावर पुजारी वर्ग, भक्तगणांच्या व्यवस्थेसाठी जरूर असणारे व्यापार, उद्योगधंदा, नोकरी वगैरे करणारी माणसे हळूहळू वाढू लागली. काही भक्तगण तिथेच कायम वास्तव्य करून राहिले. अशारितीने वस्ती वाढत असतानाच मुसलमानांनी देखील आपल्या वसाहती तिथे केल्या. त्यांनी त्या भोवताली मातीचा कोट बांधला व खंदक खणून किल्ल्याचे स्वरूप आणले. पुढे-पुढे मराठा अमलदारामध्ये इथे राजधानी आल्यावर वसाहतीत मोठीच वाढ झाली. राजवाडा झाल्यामुळे तर इतर सर्व जहागिरदार व मानकरी मंडळींनी देखील आपापले वाडे इथेच बांधले. मग इतर इनामदार आले. सर्वांची इच्छा ही की आपण किल्ल्यातच राहावे. यामुळे किल्ला भागात गर्दी झाली. पुढे राजधानीच्या संरक्षणासाठी मातीचा तट पाडून दगडी तट बांधला गेला.
श्री महालक्ष्मी देवालयाचा पूर्वीच्या सहा नैसर्गिक केंद्रावर झालेला परिणाम:
श्री महालक्ष्मीचे देवालय हे ब्रम्हपूरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, व रावणेश्वर या सहाही केंद्राच्या मध्यभागी स्थापिले गेले आणि देवालयाभोवती वसाहती होऊन त्यांना धार्मिक व राजकीय महत्व प्राप्त झाल्यामुळे ही सहाही केंद्राकडून मध्यवर्ती केंद्राकडे वसाहत वाढू लागली. सर्व सहा नैसर्गिक केंद्र व महालक्ष्मी देवालयाची वसाहत पूर्णपणे एक होण्यास जवळ जवळ एक हजार वर्षाचा कालावधी लागला. मध्यवर्ती केंद्रात अनेक कारणांमुळे जागा न मिळाल्यामुळे इतर सहाही केंद्राची वस्ती वाढू लागली व काही काळाने शहर व उपनगरे अशी स्थिती निर्माण झाली. पुढे उपनगरे विस्तृत पावून ती शहरात मिसळून गेली. त्यामधून १९ व्या शतकातील मोठ्या कोल्हापूर शहराचा जन्म झाला.
ही सर्व जागा एकत्र जोडली जाऊनही नवीन वसाहतीची गरज भासू लागली. त्यातूनच काही नवीन वसाहती निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यामध्ये शनिवार पेठ व सोमवार पेठ या दोन पेठांचा उल्लेख केला जातो. कुंभार व लोणारी यांचेकरिता किल्ल्याबाहेर खंदकापलिकडे (सध्याची पापाची तिकटीजवळ) सखल भागातील जागा देण्यात आली. शहरानजीक उत्तम शेती असलेली जमीन व तलावांनी व्यापलेली जागा सोडून इतर सर्व जागेवर वसाहतींची स्थापना झाली व जुन्या वसाहतीमध्ये वाढ झाली.
इ.स. १८६२ मधील कोल्हापूर.
१८६२ मधील कोल्हापूरचा नकाशा उपलब्ध आहे. या नकाशावरून त्यावेळीच्या कोल्हापूरची स्पष्ट कल्पना येते. शहरात मुख्यत: दोन उल्लेखनीय गोष्टी त्या काळात आढळतात. त्या म्हणजे कोल्हापूरानजीक असलेल्या अनेक सुंदर बागा व तलाव. याखेरीज नकाशात कल्पना न येणाऱ्या गोष्टी म्हणजे आरोग्य व स्वच्छता. तत्कालीन दोन इंग्रजी अधिकाऱ्यांच्या लिखाणावरून या बाबतीत त्यावेळच्या कोल्हापूरची स्थिती अत्यंत निरााशाजनक होती, असे दिसून येते. शहराची रचना वाकडी तिकडी, रस्ते अरूंद व चिंचोळे, स्वच्छता व आरोग्य अनियमित, गैरसोईच्या इमारती, घाण व दुर्गंधी इत्यादी गोष्टी शहरात आढळून येतात. अशा प्रकारे मध्ययुगातील कोल्हापूर शहराचे अवलोकन केल्यानंतर अर्चाचीन काळातील या शहराची स्थिती, वाढ विकास इत्यादींचे निरीक्षण पुढे केले आहे.
अर्वाचीन काळातील कोल्हापूर शहर
अर्वाचीन काळातील कोल्हापूराची सुरूवात इ.स. १८४४-४८ पासून झाली. इ.स. १८४४ मध्ये ब्रिटीश सरकारने कोल्हापूर शहराच्या संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला आणि तो पाहण्याकरिता मेजर ग्रॅहम यांची नेमणूक केली. इ.स. १८४५-८ च्या दरम्यान रेसिडेंसीच्या इमारती बांधल्या गेल्या. कोल्हापूरला ब्रिटीश सरकारचा जो प्रतिनिधी असे त्याला सुरूवातीस पोलिटिकल सुपरिटेंडेंट असे नाव देण्यात आले व शेवटी रेसिडेंट असे नामाधिकरण करण्यात आले. अशा रीतीने कोल्हापूर शहराच्या इतिहासात एक नवीन राजकीय केंद्र निर्माण झाले. रेसिडेंसीकरिता निवडलेल्या जागेवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अंमल होता. या जागेत कलेक्टर, जिल्हा न्यायाधिश व पोलिस अधिकारी यांचे बंगले, पोलिस हेड पॅटर, रेसिडेंसी क्लब, जिल्हा इंजिनियर यांची कचेरी इत्यादी इमारती व त्यालगतच्या ताराबाई पार्क पर्यंतचा सर्व भाग यांचा समावेश होता. प्रथमत: कोल्हापूरला लष्कर होते आणि त्यामुळे त्यावेळची रेसिडेंसी हद्द फारच मोठी होती. नंतर लष्कर हालविल्यावर हद्द थोडी कमी करण्यात आली. रेसिडेंन्सी स्थापनेनंतर अंदाजे शंभर वर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ साली ह्या सर्व हद्दीवर पुन्हा संस्थानांचा अधिकार निर्माण झाला.
रेसिडेंसीमुळे १८४४ नंतर कोल्हापूरचे राजकीय केंद्र महालक्ष्मी देवालयापासून दूर असे एक स्वतंत्र केंद्र निर्माण झाले. तत्पूर्वी असलेली धार्मिक व राजकीय युती रेसिडेंसीमुळे मोडली गेली. इ.स. १८७७-८४ च्या काळात रेसिडेंसीजवळच नवा राजवाडा बांधला गेला व महाराज तेथे राहू लागले. तेव्हापासून तर ते संपूर्णतया राजकीय के्रंद्र व देवालय हे फक्त धार्मिक केंद्र अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महाराजांना वाटले की राजवाडा देवालयाशेजारीच असावा. १८७७ साली नवा राजवाडा बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लोकांना वाटले की छत्रपतींचा वाडा रेसिडेंसीच्या वाड्याजवळ असावा.
रेसिडेंसीच्या परिणाम म्हणून सभोवताली विशिष्ट प्रकारची वसाहत निर्माण झाली. इतर सरकारी कचेऱ्या अधिकाऱ्यांचे बंगले, मिशनऱ्यांच्या संस्था, श्रीमंत व्यापारी व जमीनदार, पेन्शनर अधिकारी इत्यदींच्या या वसाहतीत समावेश होत असे. त्याचबरोबर नव्या राजवाड्यात महाराज रहायला आल्याबरोबर इतर जहागिरदार, उमराव मंडळीही आली. एक चर्चही उभारले गेले. पुढे ताराबाईर् पार्क स्थापन झाले आणि लवकरच रेसिडेंसीच्या सभोवती एक सुंदर उपनगर स्थापन झाले.
रेसिडेंसीचा आणखी एक परिणाम म्हणजे कोल्हापूर हे दळणवळणाचे मोठे केंद्र बनले. पुणे व बेंगलोर ही मुख्य लष्करी ठिकाणे जोडताना इतर लहान लष्करी केंद्राबरोबरच कोल्हापूरवरून हा रस्ता केला गेला. या प्रमाणे समुद्राकडे जाण्यासाठी आंबा घाट फोडून कोल्हापूर रत्नागिरी हा रस्ता केला गेला. या रेसिडेंसीचा संबंध असलेली सांगली व मिरज ही शहरे जोडणारा रस्ताही झाला. कोल्हापूर हे प्रत्येक पेठेला व जहागिरीला जोडलेले असल्यामुळे पन्हाळा, बावडा, राधानगरी, गारगोटी, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इत्यादी गावांशी रस्त्याने जोडले गेले. अनेक पूल बांधण्यात आले. चिकोडी रोड-फोंडा रस्त्यामुळे कोल्हापूर हे सावंतवाडी, विजयदुर्ग व मालवण या भागास जोडले गेले. शेवटी १८९१-९२ ला मिरजेहून कोल्हापूर रेल्वे लाईन टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर हे एक मोठे दळणवळाचे केंद्र बनले. आंबा फोंडा घाट फोडल्यामुळे कोल्हापूरला जवळ-जवळ कोकणाचे दार म्हणण्याइतपत महत्व आले.
इ.स. १८४४ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अधिकार सूत्रे धारण केली त्यावेळी त्यंाच्या लक्षात आले की स्टेशनजवळ एक व्यापारी पेठ करता येणे शक्य आहेे, म्हणून त्यांनी इ.स. १८९५ मध्ये शाहूपुरी वसाहत स्थापन करण्याची आज्ञा केली. १९२० पर्यत त्या वेळचे संस्थानचे इंजिनियर रावसाहेब विचारे व नगरपालिकेचे सुपरिटेंडेंट श्री भास्करराव जाधव यांनी ती आज्ञा पार पाडली. कोल्हापूरच्या आसपास ऊसाची लागवड करून गूळ तयार करण्याची पद्धत फार पूर्वीपासून होती. गेल्या शतकात व त्यांनतर देखील ऊसाची लागवड करणे वाढतच गेले. इ.स. १९०१ साली अदमासे १५ हजार एकरात ऊसाची लागवड होत हेाती. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गूळ निर्माण केला जात असूनही कोल्हापूरला त्यावेळी गुळाची व्यापार पेठ नव्हती. कोकणात राजापूर व सांगलीला व्यापारी पेठेतून कोल्हापूरचा गूळ खपत असे. श्री शाहू महाराजांची गूळ व शेंग याचा व्यापार कोल्हापुरातच व्हावा ही महत्वकांक्षा होती, म्हणून त्यांनी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना कोल्हापुरात यायचे आमंत्रण दिले. जे व्यापारी आले त्यांना विनामूल्य जागा देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर करामध्येही सवलती देण्यात आल्या. शाहूपुरी पेठेचा इतिहास सुमारे ७० वर्षाचा आहे. एवढ्या अल्पावधीत जागा न राहिल्यामुळे अलिकडच्या काळात शहराबाहेर स्वतंत्र मार्केट यार्ड स्थापना करून गूळ बाजारपेठ हलवावी लागली. शाहूपुरी व्यापार पेठेमुळे कोल्हापूर शहराचा तसेच संस्थानचाही फार मोठा फायदा झाला. त्याचे सर्व श्रेय श्री शाहू छत्रपतींच्याकडे जाते.
गेल्या शतकात कोल्हापूरला शेक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्नीय जीवनात मोठे महत्व आले. या कार्याचीही सुरूवात श्री शाहू छत्रपतींनीच केली. महाराष्ट्नतील ब्राह्मणेत्तर समाज मागासलेला असून शिक्षणाखेरीज त्यांची उन्नती होणार नाही हे दिसून आल्यावर त्यांनी कोल्हापूर संस्थानात आधुनिक पद्धतीच्या शिक्षण संस्था स्थापन करून मागासेलेल्या समाजातील सुशिक्षित तरूणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरूवात केली व त्याबरोबर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बहुजन समाजाच्या पायात अडकलेली धार्मिक बेडी तोडण्याचे प्रयत्न केले व सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला. या सर्व गोष्टीमुळे बहुजन समाजात प्रचंड जागृती झाली. श्री शाहू महाराजांचे धोरण श्री राजाराम महाराजांनी तसेच पुढे चालू ठेवले. त्यामुळे हे दक्षिण महाराष्ट्नतील सर्वात मोठे शैक्षणिक केेंद्र बनले. सध्या तर शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.
नव्या वसाहतींची वाढ
रेसिडेंसी जवळील ताराबाई पार्क वसाहतीनंतर शाहूपुरी वसाहत पूर्ण झाली. जुने शहर व जयंती नाल्यापर्यंत आलेली ही वसाहत यांच्या मध्ये असलेल्या खुल्या शेतीच्या जागी लक्ष्मीपुरी वसाहत निर्माण झाली. त्यावेळचे दिवाण बहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेली ही वसाहत सन १९२६ ते ३७ या काळात पूर्ण झाली. या वसाहतीनंतर देखील लोकांना जागा अपुरी पडू लागल्यावर इ.स. १९२९ साली राजारामपुरी वसाहत करण्यात आली. त्यानंतर १९३३ मध्ये राजारामपुरी व रेल्वे लाईन यांच्यामध्ये साई एक्स्टेंशनचा जन्म झाला. जसजशा नव्या वसाहती होत गेल्या तसतशा त्यांच्या निर्मितीत झालेले दोष सुधारत गेले. समाजाचे सर्व शिक्षण बहुधा प्रयत्न व प्रमाद या तत्वानेच होत असे.
शहराबाहेर नव्या वसाहती होत असतानाच वाढत्या लोकवस्तीच्या सोयीकरिता जुन्या शहरातील खुल्या जागेवर वसाहती होऊ लागल्या. त्यामध्ये शहरात मुख्यत: खासबाग, साकोली, वरुणतीर्र्थ (१९४४-४५), रावणेश्वर (१९४५), बेलबाग (१९४६), उद्यमनगर(१९४७), मस्कुती तलाव(१९५३) वगैरे ठिकाणी तळी बुजवून व शेतीच्या जमिनीत वसाहती निर्माण केल्या.
बऱ्याच कालावधीनंतर सन १९४१-४७ च्या दरम्यान रस्ते रूंदीचे काम मोठ्या प्रमाणावर केले गेले. यावेळी झालेले मुख्य रस्ते म्हणजे लक्ष्मीपुरी ते शेरीबाग, महाद्वार रोड-बिनखांबी गणेश मंदीर ते पाण्याचा खजिना यात वाढ व सुधारणा, श्री महालक्ष्मी देवालयासमोरील रस्ता, ताराबाई रोड, टेंबे रोड, सेंट्न्ल रोड(साठमारी ते रविवार पोलिस गेट), साठमारी ते राजारामपुरी, फिरंगाई रोड व कलेक्टर कचेरी ते शाहूपुरी (असेंब्ली रोड) याखेरीज या भागात या कालाल प्रथमच मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेेले कार्य म्हणजे भंगी पॅसेज. यामुळे शहरातील घाण कमी होऊन आरोग्य सुधारणा होण्यास मदत झाली.
पूर्वीच्या तुलनेत आत्ताचं कोल्हापूर खूपच विस्तारलं आहे. सर्वच बाजूंनी कोल्हापूर वेगाने वाढते आहे. नव्या वसाहतींची भर पडत आहे. रत्नाप्पा नगर, जरग नगर, साने गुरूजी वसाहत इत्यादीसारख्या अनेक वसाहती वसल्या आहेत. नजीकच्या कळंबा, फुलेवाडी, उचंगाव इ. अनेक ग्रामपंचायतीमध्ये व कोल्हापूर शहरामध्ये फरकच करता येऊ नये इतक्या त्या कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. शासनाने तो तत्वत: मान्यही केलेला आहे. फक्त कायदेशीर स्वरूपच काय ते येण्याचे बाकी आहे. पण नजीकच्या काळात कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अपरिहार्य गोष्ट आहे. अलिकडे झालेल्या कोल्हापूरच्या मास्टर प्लॅनमुळे शहरातील अनेक महत्वाच्या भागातील रस्ते रूंद करण्यात आलेले आहेत.
Monday, October 8, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
कोल्हापूरचे प्राचिन नाव कुंतल आहे.
Post a Comment